सक्षम स्त्री, सक्षम देश

संस्थे विषयी

RSICC

महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी ही संस्था गेली दीडशे वर्ष शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. श्री. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदपुरकर यांनी 'राष्ट्रीय शिक्षण' देण्याच्या उदात्त ध्येयापोटी या संस्थेची स्थापना केली.

१८६० साली १० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेत आता ५०,००० विद्यार्थी शिकत आहेत. शिशुशाळेपासून पदव्युत्तर शिक्षण व संशोधन करणाऱ्या महाविद्यालयापर्यंत संस्थेचा विस्तार झाला आहे. सामाजिक जाणीव, राष्ट्रीय चारित्र्य संवर्धन, मूल्याधिष्ठित शिक्षण व पर्यावरण रक्षणाभिमुख जीवनशैलीचे शिक्षण सामान्य मुलांपर्यंत रूजविण्याचे काम ही संस्था करत आहे. ही सारी उद्दिष्टे खऱ्या अर्थाने साध्य करायची असतील तर या साऱ्या प्रक्रियेत महिलांचा फार मोठा सहभाग असणं अपेक्षित आहे.

म्हणूनच महिलांचं सक्षमीकरण हा प्रमुख उद्देश समोर ठेऊन म. ए. सो. ने १९८९ साली रेणुका स्वरूप व्यवसाय प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली. आज आकाशाला गवसणी घालणाऱ्या क्षेत्रांमध्येही महिला उत्तुंग यश संपादन करत आहेत असं एकीकडे चित्र असलं तरी आजही अनेक मुलींना, महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी छोट्या - मोठ्या कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमांची गरज आहे. म्हणूनच रेणुका स्वरूप व्यवसाय प्रशिक्षण संस्थेत असे अनेकविध अर्धवेळ, पूर्णवेळ प्रशिक्षणवर्ग चालविले जातात. येथील प्रत्येक प्रशिक्षणार्थी स्वयंपूर्ण व्हावीत म्हणून तज्ञ शिक्षकवर्ग, पोषक शैक्षणिक वातावरण, प्रात्यक्षिक कामाचा भरपूर अनुभव, संस्थाभेटी, मार्गदर्शक व्याख्याने यासारखी वैशिष्ट्ये संस्था जपते आहे.अशा प्रशिक्षित महिला स्वतःचे व्यक्तिमत्व समृद्ध करतीलच आणि संपूर्ण समाजाच्या पुनर्निर्माणामध्ये बहुमोल योगदान देतील असा विश्वास वाटतो.